जळगाव (प्रतिनिधी) – शाळेतून घरी आईसोबत जात असलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला भरधाव डंपरने उडविल्याची घटना घडली आहे. उपचारापुर्वी चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाला असून नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हृदयद्रावक आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४, रा. माऊली नगर, जळगाव) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. योगेश नेमाडे हे पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा आणि मुलासह माऊली नगरात वास्तव्याला आहेत. त्यांची चार वर्षाची मुलगी प्रेरणा ही जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत आहे. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता या स्कूटीने तिला (एमएच १२ ईडब्ल्यू ८८२९) घेण्यासाठी गेल्या होत्या. घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (एमएच १९ सीवाय ६७६९) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात केली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मतापित्यानी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.