अमळनेर येथील घटना
अमळनेर(प्रतिनिधी) : आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना एकाचा गळा कापला गेल्याची घटना १४ रोजी सकाळी तांबेपुरा भागात नंदगाव रस्त्यावर घडली.

महेश भीमराव पाटील (रा रंजाणे वय ४६) हे मुलीला शाळेत सोडण्यासाठी येत असताना रस्त्यात त्यांच्या गळ्याला मांजाने कापले गेले मात्र त्यांना काहीच जाणवले नाही. मुलीने जेव्हा त्यांना सांगितले की तुमच्या गळ्यातून रक्त येत आहे. त्याचवेळी तेथे साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह हजर असलेले आरोग्य निरीक्षक संतोष माणिक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने नगरसेवक मुक्तार खाटीक याना बोलावले.
तात्पुरता गळ्याला रुमाल बांधून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉ आशिष पाटील यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात पाठवले. डॉ संदीप जोशी यांनी तातडीने उपचार केले. जखम खोल होती मात्र वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले. दुर्दैवाने जर श्वास नलिका कापली गेली असती तर जागीच प्राण गेले असते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी पाटील यांचे प्राण वाचले.यामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्या विक्रेत्यांवर संताप व्यक्त होत आहे.









