जळगाव ( प्रतिनिधी ) – मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ५२ वर्षीय दुचाकीस्वाराच्या अंगावर अचानक झाड कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अभिनव शाळेसमोरील तेली समाज मंगल कार्यालयाजवळ घडली. जखमी राजेश भिका देशमुख (वय ५२, रा. रामानंद नगर, जळगाव) यांच्यावर डाबी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश देशमुख हे धुळे येथील आदिवासी विकास विभागात लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी दुचाकीवरून शहरात आले होते. शाहूनगर परिसरातून जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला असलेले झाड मूळासकट कोसळले आणि त्यांच्या अंगावर पडले. झाडाच्या फांद्या आणि खोडांच्या तडाख्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना रिंगरोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना डाबी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. सध्या तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान, झाड कोसळल्याने जवळ उभी असलेली रविंद्र सावळे यांच्या (एमएच १९ ईई ७६७२) क्रमांकाची दुचाकी झाडाखाली दबल्याने तिचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड कापून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला.
या अपघाताने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी शहरातील झाडांची नियमित छाटणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.









