यावल शहरातील घटना
यावल ( प्रतिनिधी ) – शहरातील फॉरेस्ट नाक्याजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारखेडा येथील रसूल रहिमान तडवी, आलिशान रहिमान तडवी व सलीमा रहिम तडवी हे तिघेजण दुचाकी (क्रमांक MH-19/DY-9047) वरून अंकलेश्वर-बुरहानपूर राज्य मार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळून जात असताना, चारचाकी वाहन (क्रमांक MP-09/WL-3915) ने समोरून येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेत तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत रसूल तडवी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळे करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.









