दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; एक जखमी, गावात शोककळा
जळगाव ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील अकुलखेडा परिसरात पहाटेच्या शांत वातावरणाला चिरत सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण गावाला हादरवून सोडले. दहावीच्या शिकवणीसाठी दुचाकीने जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांना समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या हादऱ्यात जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) या तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र नील हर्षल पाटील गंभीर जखमी झाला आहे.
अकुलखेड्याजवळील महाजन कुटुंबावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शांत, अभ्यासू आणि सदैव हसतमुख असलेला जय आपल्या आई-वडील, लहान भाऊ आणि आजी-आजोबांसह राहत होता. दहावीचे शिक्षण घेणारा जय नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे आपल्या वर्गमित्र नील पाटील (रा. अकुलखेडा) याच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच १९ एयु ३०५८ वरून चोपड्याकडे ट्युशनसाठी निघाला.
अकुलखेड्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आल्यानंतर समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या बस क्रमांक एमएच १४ बीटी २०८३ ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली.
उपचार सुरू होण्यापूर्वीच जयचा मृत्यू
अपघातानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी जयचा उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. नील पाटीलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे अकुलखेडा गावात हळहळ व्यक्त होत असून रुग्णालयात नातेवाईकांनी तीव्र आक्रोश केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








