एरंडोल शहरातील दिवसाची घटना
एरंडोल (प्रतिनिधी) – अज्ञात व्यक्तीने बँकेच्या समोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एच.डी.एफ.सी.बँकेसमोर घडली. बँकेच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सम्यक इंग्लिश विद्यालयाचे बांधकाम सुरु असल्यामुळे ठेकेदारास पैसे द्यावयाचे असल्यामुळे शाळेच्या प्राचार्या निता पाटील यांनी शाळेतील शिक्षक उज्वलसिंग विजयसिंग पाटील यांना धनादेश दिले. उज्वलसिंग पाटील यांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेतून तीन लाख रुपये काढले आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर उज्वलसिंग पाटील हे दुचाकी क्रमांक एम.एच.१९ बी.व्ही.५२८८ ने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. बँकेच्या समोर दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी उभी करून ते बँकेत गेले असता अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे अडीच लाख रुपये रोख काढून पसार झाला.
उज्वलसिंग पाटील हे बँकेतून बाहेर आले असता त्यांना डिक्की उघडी दिसली.त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता अज्ञात चोरट्याने डिक्कीतील तीन लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये लंपास केल्याचे लक्षात आले आणि पन्नास हजार रुपये डिक्कीतच आढळून आल्याने ते त्वरित बँकेत गेले आणि बँकेतील सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज पाहिले असता एक संशयित त्याठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले. अज्ञात चोरटा स्टेट बँकेपासूनच उज्वलसिंग पाटील यांचा पाठलाग करीत असण्याची शक्यता आहे. उज्वलसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार तपास करीत आहे.