कासोदा येथील घटना
कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल–कासोदा मुख्य रस्त्यावरील साई हॉस्पिटलसमोर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात कापूस व फळांचा व्यापार करणारे अशोक भिका भोई (वय ५५) यांचा मृत्यू झाला. आडगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने (एमएच १५ केई २९४९) दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर तत्काळ त्यांना एरंडोलहून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. संध्याकाळपर्यंत कासोदा पोलिस ठाण्यात घटनेची अधिकृत नोंद झाली नव्हती.
मयत अशोक भोई हे कासोदा गावातील ग्रामस्थांत लोकप्रिय असून कापूस तसेच फळांचा व्यापार ही त्यांची अनेक वर्षांची ओळख होती. ते स्थानिक भोई समाजाचे अध्यक्ष हिंमत भिका भोई यांचे लहान भाऊ होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने कासोद्यात शोककळा पसरली असून व्यापारी व सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.









