यावल तालुक्यातील साकळी गावाजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकळी गावाजवळ यावल-चोपडा राज्य महामार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेन्द्र रमेश सपकाळे (वय ४५ वर्ष, रा. वढोदा ता. यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते साकळी गावाकडून वढोदा गावाकडे आपल्याकडील (एमएच १९ ईबी ५४४२) या दुचाकीने येत होते. यावेळी वसंत महाजन यांच्या जिनिंगजळील पुलाच्या वळणावर सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास दुसऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात राजेंद्र सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, मयत राजेंद्र सपकाळे यांचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.