जळगाव तालुक्यात चिंचोली पुलाजवळची घटना, जुन्या जळगावात शोककळा
जळगाव ( प्रतिनिधी ) – नातेवाईकांच्या उत्तर कार्यावरून जळगावला घरी परतत असताना कुटुंबीयांच्या दुचाकीला चिंचोली पुलाजवळ भीषण अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट पुलाखाली कोसळली. यात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किरण उर्फ राजू लक्ष्मण चव्हाण (वय ४०, रा.कोल्हेवाडा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह राहत होता. शहरातील आठवले हॉस्पिटल येथे गेल्या ३० वर्षांपासून तो काम करीत होता.(केसीएन)दरम्यान, जामनेर येथे नातेवाईकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तरकार्याला गुरुवारी १ जानेवारी रोजी तो सकाळी गेला होता. या वेळेला मुलगा घरीच होता.
जामनेर येथील उत्तरकार्याचे काम आटोपून जळगाव येथे घरी दुचाकीने परतत असताना किरण उर्फ राजू यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातामध्ये किरण उर्फ राजू याचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. तर त्याची पत्नी हर्षदा किरण चव्हाण (वय ३५) आणि मुलगी अस्मि किरण चव्हाण (वय १३) हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी गर्दी झाली.
ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले तर मयत किरण याला शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान किरण चव्हाण यांच्या मृत्यूमुळे जुने जळगावमध्ये शोककळा पसरली आहे.









