चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील डॉ. आंबेडकर मार्केटच्या मागील बाजूस दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी चंदन संचानंद भारती (वय २७, रा. कुंवर नगर, सिंधी कॉलनी) हे ५ एप्रिल रोजी दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास आंबेडकर मार्केट परिसरात गेले होते. तेथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून त्यांचा चार अनोळखी तरुणांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित आरोपींपैकी एकाने आपल्याजवळील धारदार शस्त्राने चंदन भारती यांच्या कमरेच्या खाली दोन वेळा वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या एकाने त्यांच्या डोक्यावर फायटरने प्रहार केला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे मित्र विशाल इंगळे आणि धीरज बाविस्कर यांनाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. जखमी चंदन भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यातगुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उल्हास च-हाटे करत आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.









