मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाजवळील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): कोथळी ते मुक्ताईनगर रस्त्यावर दुचाकी दुभाजकाला (डिवायडर) जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुण ठार झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास कोथळी गावाजवळील खंडेराव मंदिरासमोर घडली.

मयत वैभव राजेंद्र कठोरे (वय २१, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) हा आपल्या ताब्यातील हिरो होंडा स्लेंडर मोटारसायकलने (क्रमांक एमएच -१९-सिपी-३२९६) कोथळीकडून मुक्ताईनगरच्या दिशेने जात होता. कोथळी गावाजवळ असलेल्या खंडेराव मंदिरासमोरील रस्त्यावर वैभवचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन जोरात धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की, वैभव याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात तो स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे वडील अनिल रामकृष्ण कठोरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत बोदडे करत आहेत.









