एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मेहरूण तलाव परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या इतर ३ अशा एकूण ४ दुचाकी हस्तगत केले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सिंधी कॉलनी परिसरात सिद्धार्थ लुल्ला यांची दुचाकी २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनच्या दिवशी तलाव परिसरातून चोरी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये संशयित आरोपी हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सुप्रीम कॉलनीमध्ये सापळा रचून संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याला अटक केली. त्याच्या जवळील चोरीची दुचाकी हस्तगत केली.
त्याची अधिक चौकशी केली असता त्याने इतर चोरीच्या ४ दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी चारही दुचाकी ताब्यात घेऊन संशयित आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले, असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे आणि ललित नारखेडे यांनी केले.