एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत शहरातील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीबाबत १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:१३ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी सिद्धार्थ दीपक शर्मा (वय २३, रा. बालाजी मंदिर जवळ, जळगाव) यांनी तक्रार दिली होती की, २९ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास त्यांच्या २५,००० रुपये किमतीच्या बजाज पल्सर दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. १७ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजता आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुंसुबा, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३३ वाजता दुसरा दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी सायरस महेश बोंडे (वय २८, रा. किसनराव नगर, जळगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ परिसरातून ३५,००० रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल चोरीला गेली होती. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८:४९ वाजता सुरज मुनेंद्र द्विवेदी (वय २२, रा. सेक्टर डी, साईमत ऑफिस जवळ, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत झनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, पोकॉ सिद्धेश्वर डापकर, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे, रतन गीत, छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे, विशाल कोळी यांनी विशेष मेहनत घेतली.