वाहतूक शाखेकडून २ लाखांचा दंड वसूल
जळगाव (प्रतिनिधी) :- नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे मद्य प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांतर्फे तपासणीत नववर्षांच्या पूर्वसंध्येला १३२ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई जळगाव शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली. या कारवाईअंतर्गंत २६ नागरिकांनी २ लाख ६० हजार रुपये दंड भरला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातच नव्हे तर देशभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे तसेच पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. थर्टी फस्टला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर जळगाव शहरात विविध परिसरात कारवाई करण्यात आली. हि कारवाई वाहतूक शाखा व जळगाव शहरातील पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत १३२ तळीरामांना पकडण्यात आले. या सर्वांवर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वाहतूक शाखेने ५० तळीरामांवर न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणानुसार २६ नागरिकांनी २ लाख ६० हजार रुपये दंड १ जानेवारी रोजी भरला आहे.