देशभरातील ३० महाविद्यालयांचा सहभाग ; ४ क्रीडा प्रकारांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे बुधवार दि. ८ ऑक्टोबर ते दि, १० ऑक्टोबर या कालावधीत आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या निलीमा वारके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोदावरी संगीत महाविद्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. चंद्रकांत डोंगरे उपस्थित होते. प्राचार्या निलीमा वारके यांनी सांगितले की, एसएनडीटी महाविद्यालयाच्या मुंबई विद्यापीठांतर्गत जळगावात प्रथमच आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व एकलव्य क्रीडा संकुल अशा दोन ठिकाणी होणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, टग ऑफ वार, तायक्वांदो या स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार असून ॲथलेटीक्सच्या स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुल येथे होणार आहेत.
बुधवारी दि. ८ रोजी या स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी एसएनडीटी महाविद्यालयाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एसएनडीटीच्या व्हाईस चान्सलर डॉ. रूबी ओझा, क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, खासदार ॲड. उज्वल निकम, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अतुल जैन, प्रा. नारायण खडके, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच एसएनडीटी महाविद्यालयाचे माजी सदस्य एस.डी चौधरी, आमदार सुरेश भोळे, डॉ. दिनेश पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, काऊन्सील मेंबर डॉ. वैभव पाटील, राजेश जाधव, प्रदीप तळवलकर, देवदत्त पाटील, अजित घाडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशभरातील ४५० स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आली आहे. तसेच स्पर्धकांना नेण्या-आणण्यासाठी वाहनांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता डीजे नाईटचेही आयोजन करण्यात आले आहे. तर १० ऑक्टोबर रोजी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.