गोदावरी फाउंडेशन परिवारावर शोककळा
जळगाव ( प्रतिनिधी ) – समाजसेवक, आणि शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील यांच्या मातोश्री गोदावरी आई यांचे आज दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १.३४ ला निधन झाले आहे. त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने गोदावरी परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोदावरी आई त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या परिवाराला जीवनात प्रेरणा मिळाली. त्यांनी कुटुंब आणि समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्या सदैव स्मरणात राहतील.
गोदावरी आईंच्या निधनाने डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील आणि प्रमिलाताई यांच्यासह संपूर्ण गोदावरी परिवारावर शोककळा पसरली आहे. आपल्या पाठीशी असलेल्या माउलीचा हात अचानक निघून जाणे हे कोणत्याही लेकरासाठी अत्यंत वेदनादायी असते. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो, आणि पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, गोदावरी आई यांचे उद्या सकाळपर्यंत अंतिम दर्शनासाठी पार्थिव गोदावरी हॅास्पिटल, भास्कर मार्केट जळगाव येथे राहील. अंतिम संस्कार उद्या सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे होणार आहेत.