जामनेर तालुक्यात शेंदुर्णीजवळ भरधाव वाहनाने चिरडले
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील बाहेरपुरा येथील माहेरवाशीण डॉ. स्नेहल प्रीतम रावते (वय २४) हिचे दि. १६ जून रोजी रात्री जामनेर तालुक्यात शेंदूर्णीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. लंडनला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. या घटनेने संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जामनेर येथे दि. १६ जून रोजी डॉ. स्नेहल या त्यांचे वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत पासपोर्टसंदर्भातील कागदपत्रे पोलिसांना देण्यासाठी गेल्या होत्या. कामे आटोपून जामनेर ते पाचोरा या परतीच्या प्रवासात रात्रीच्या सुमारास शेंदुर्णी, ता. जामनेरजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने पेंढारकर यांच्या वाहनाला दिलेल्या धडकेत स्नेहल रावते यांना चिरडले.(केसीएन) घटनास्थळी ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली, तसेच जवळच्या पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दुर्दैवाने, स्नेहल यांचे वडील किशोर पेंढारकर यांच्या डोळ्यांदेखतच ही घटना घडल्याने कुटुंबाचा आक्रोश ऐकून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. स्नेहल ही पाचोरा येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातील होती. तिच्या अकाली निधनाने पाचोरा परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहे.