जळगाव, (प्रतिनिधी) – ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. अनुभूती निवासी स्कूलमध्ये “शरण संकुल” या नृत्य नाट्यांतर्गत वचननृत्य, मल्लखांब, मल्लीहग्गा या रंजक कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन व अनुभूती स्कूलच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, स्कूलचे प्राचार्य देबाशिस दास उपस्थित होते.
आरंभी श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थित उपरोक्त मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. संगीत, वचन नृत्य, नाट्य या सोबतच चित्त थरारक मल्लखांब तसेच मल्लीहाग्गा यांच्या प्रात्यक्षिकांमुळे १३ जूनची सायंकाळ उपस्थितांसाठी समृद्ध झाली. श्री. तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ यांच्या अखत्यारीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील १२० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सांस्कृतिक समृद्धी व कलात्मक उत्कृष्टतेने परिपूर्ण असे अनोखे सादरीकरण केले. आरंभी ‘यक्षगान’ झाले. हा उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यांचा एक प्रसिद्ध कला प्रकार आहे. ही नृत्य आधारित कला सुरुवातीला स्थानिक शैलीत होती, परंतु नंतर ती विविध प्रकारांमध्ये मिसळली गेली. गाणे, नृत्य, वेशभूषा, भाषण आणि वाद्ये या पाच भागांचा समावेश असलेली ही कला नवरसावर आधारित आहे.
यक्ष, गंधर्व, किन्नर, किंपुरुष यांसारख्या वेशभूषा, चंदे वाजवण्याचे सूर, भगवतांचे गायन, दानवांच्या चेहऱ्यावरील हावभाव इत्यादींमुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची अनोखी ताकद या कार्यक्रमात आहे. डॉ. के शिवराम कारंथजी यांनी या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. मल्लखांब हा भारतातील सर्वात प्राचीन सांप्रदायिक खेळांपैकी एक आहे. १२ व्या शतकातील चालुक्य समत सोमदेव यांच्या ‘मनसोल्लासा’ या ग्रंथात या खेळाचा उल्लेख आहे. १९ व्या शतकात मराठा पेशव्यांच्या दरबारातील राजे पुरोहित श्रीगुरु दादा देवधर बालभट्ट यांनी हे मल्लखांब सर्वप्रथम सुरू केले. पुढे मराठी माणसांनी त्याला अधिक प्रसिद्धी दिली. मल्लीहाग्गा हा मल्लखांब प्रमाणे कसरतीचा प्रकार आहे मल्लीहाग्गा म्हणजे वरून टांगलेली दोरी. त्या दोरीवर चढून विविध आसने, चित्तथरारक कसरती सादर होतात.
शरण संकुल हा नृत्य नाटिकेतून अक्कम महादेवी,अल्लामप्रभू, बसवण्णा किंवा बसवेश्वर यांचे जीवन दर्शन घडविणारा आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला गेला. यावेळी अतुल जैन यांनी कलाकार व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार केला. दीड तासाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने कलाअनुभूती घेतली.