विविध क्षेत्रातून टीकेची झोड, सामाजिक कार्यकर्त्यांची नाराजी
मुंबई ( वृत्तसेवा ) – निर्भीड राजकीय भूमिकांसाठी आणि कोरोना काळात केलेल्या प्रभावी जनजागृतीसाठी ओळखले जाणारे लंडन येथील रहिवासी, मूळ एरंडोल येथील रहिवासी तथा डॉक्टर, लेखक व कार्यकर्ते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. यांनतर एकच खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे राजकीय, सामाजिक तसेच मानवाधिकार क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

डॉ. संग्राम पाटील हे व्यवसायाने डॉक्टर असून ते दीर्घकाळापासून लंडनमध्ये स्थायिक आहेत. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देशात भीतीचे वातावरण असताना त्यांनी यु ट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून विज्ञानाधारित माहिती देत लाखो लोकांना धीर दिला होता. अफवा आणि गैरसमज दूर करताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अनेकदा स्पष्ट व सडेतोड टीका केली होती, ज्यामुळे ते कायमच चर्चेत राहिले.
या टीकात्मक भूमिकेमुळेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही काळ निर्बंध घालण्यात आले होते. त्याबाबतचा खुलासा त्यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे केला होता. अशा पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर झालेली ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, डॉ. पाटील यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, याचा अधिकृत खुलासा अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेला नाही.
या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे का?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सांगितले की, सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येताक्षणी ताब्यात घेणे अत्यंत दुर्दैवी आहे. ही कारवाई आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी असून, मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने या कारवाईचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस पक्ष या दडपशाहीचा जाहीर निषेध करीत असल्याचेही सपकाळ यांनी ठामपणे सांगितले.
या प्रकरणावर ज्येष्ठ विधिज्ञ व मानवाधिकार कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, डॉ. संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतले. पहाटे २ वाजल्यापासून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या निमित्ताने रोखून ठेवण्यात आले आहे. हा प्रकार अन्यायकारक असून, सरळसरळ छळवाद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.









