एरंडोलमध्ये महायुतीच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
एरंडोल ( प्रतिनिधी ) – शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीचा तापता माहोल आणखी रंगतदार बनवत भाजप-शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या कॉर्नर सभेला महिला आणि पुरुष मतदारांची लक्षणीय गर्दी झाली. शहर विकासाच्या आश्वासनांनी भरलेला हा प्रचार कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने गजबजलेला होता.

समितीच्या प्रमुखांसह माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, अशोक चौधरी, राजू चौधरी, तालुकाध्यक्ष एस.आर. पाटील, सुनील पाटील, योगेश महाजन, माजी नगरसेवक संजय महाजन, गजानन महाजन, रामभाऊ चौधरी, सुनील चौधरी आदींसह युतीचे सर्व उमेदवार या सभेत उपस्थित होते. शहराच्या परिवर्तनाचा संकल्प व्यक्त करत सर्व मान्यवरांनी महायुतीच्या पॅनलला जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळी भाषण करताना डॉ. ठाकूर यांनी मतदारांना मोठे आश्वासन देत निवडणूक संपताच शहरात तब्बल १२० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. आमदार अमोल पाटील यांची ठाम साथ असल्याने शहराचा विकास जलद गतीने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी “मी बाहेरचा उमेदवार नसून, माझा जन्म, बालपण आणि शिक्षण सर्व एरंडोलमध्येच झाले आहे,” असे स्पष्ट केले. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्नी सौ. गीतांजली ठाकूर शहरात सोनोग्राफी सेंटर चालवत असून कुटुंब शहराची सेवा करत आहे, हेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी कोणत्याही भ्रमात न पडता महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, आम्ही शहरासाठी मोठा निधी आणून एरंडोलचा विकास महाराष्ट्रात आदर्श ठरेल असा करू, अशी ग्वाही देत डॉ. ठाकूर यांनी प्रचार सभेचा समारोप केला.









