महाराष्ट्र अंनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा उत्साहात, हितचिंतकांचा केला सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक व्यक्ती विवेकी झाली पाहिजे, हे आपले ध्येय आहे. यासाठी प्रत्येक शाखेच्या पातळीवर सक्षमता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात सशक्त संघटन असलेली व संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे नेणारी चळवळ म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असे प्रतिपादन राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संकल्प व प्रेरणा मेळावा रविवारी दि.९ रोजी दिवसभर घेण्यात आला. बैठकीत राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य प्रकल्प विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी, राज्याचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी, तिन्ही जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, सुनील वाघमोडे, विश्वजीत चौधरी, नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर.बी. देशमुख हे होते. बैठकीमध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त मांडले जाणार आहे.
मेळाव्यात समितीच्या कार्यकर्त्यांसह २५ हितचिंतकांचा प्रमाणपत्र, पुस्तक, पुष्प देऊन सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले. यासह अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या देणग्या संकलन तसेच शाखेच्या साप्ताहिक बैठक व कामांचा आढावा घेण्यात आला. नविन २ वर्षाची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी यांनी मनोगतात दोन वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रसंगी डॉ. प्रदीप जोशी आणि नेमिवंत धांडे यांनी, समितीच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून भविष्यात कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने शाखावृद्धीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
यानंतर नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात येऊन नवीन सद्स्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी केले. आभार प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी मानले. मेळाव्यासाठी जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष आनंद ढिवरे, सचिव हेमंत सोनवणे, प्रा. दिलीप भारंबे, गुरुप्रसाद पाटील, दिनेश पाटील, मिनाक्षी चौधरी आदीनी परिश्रम घेतले.