निःशुल्क सेवा देत ११ कॅन्सर रुग्णांना जीवदान दिल्याबद्दल सन्मान
जळगाव प्रतिनिधी :वैद्यकीय सेवा ही वैद्यकीय व्यवसाय होत चालल्याच्या काळात कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार करून सेवाभाव जपणारे डॉ. नीलेश चांडक यांचे कार्य प्रशंसनीय आहे, त्यांचा आदर्श अन्य डॉक्टरांनीही घ्यावा, असे गौरवोद्गार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
धुळे जिल्हा रुग्णालयात मंत्री आबिटकर यांच्याहस्ते अद्ययावत कार्डियाक कॅथ लॅबचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार राम भदाणे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, माजी आमदार प्रा. शरद पाटील उपस्थित होते.
सेवाभाव वृत्तीचा सन्मान
केवळ वैद्यकीय सेवा न करता आपणही समाजाचे काही देणे लागते, या भावनेतून धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ११ कॅन्सर रुग्णांवर अवघड शस्त्रक्रिया करीत डॉ. नीलेश चांडक यांनी रुग्णांना जीवनदान दिले आहे. कॅन्सरच्या रूग्णांवर विनामूल्य क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया आणि प्लास्टीक सर्जरी करीत साामाजिक बांधिलकी डॉ. चांडक यांनी जोपासली. त्यांच्या या सेवाभावाची थेट आरोग्य विभागाने दखल घेतली. या सेवाभावामुळेच त्यांचा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. चांडक यांच्यासमवेत धुळे जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉ. अश्विनी भामरे, त्यांचे सहकारी डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. सुवर्णा सूर्यवंशी, मुखरोग विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, डॉ. अटलानी आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. नीलेश चांडक यांनी नि:शुल्क सेवा देत रुग्णांना जीवदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. चांडक यांचे कौतुक केले. खासगी डॉक्टरांनी अशा पद्धतीने सेवाभाव वृत्तीने पुढे आल्यास निश्चितच लोकांच्या मनात डॉक्टरांविषयी अधिक सन्मान वाढणार आहे. डॉक्टर हा देवदूत आहे, असे लोक मानतात. प्रत्येक देवदूताने डॉ. चांडक यांच्याप्रमाणे प्रयत्न केला तर डॉक्टरांची सामाजिक प्रतिष्ठा अजून वाढण्यास मदत होऊ शकते. अन्य खासगी डॉक्टरांनी डॉ. चांडक यांचा आदर्श घेऊन पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. चांडक यांच्याविषयी लोक जे चांगले बोलतात त्यापेक्षा मोठे प्रमाणपत्र कोणतेही नाही, असे म्हणत आरोग्य मंत्र्यांनी डॉ. चांडक यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांनी डॉ. नीलेश चांडक यांच्या कार्याचा लेखाजोखा यावेळी मांडला. डॉ. चांडक यांनी कॅन्सरच्या जटिल आणि खर्चिक शस्त्रक्रिया मोफत सेवा देऊन केल्या. त्यांच्या या सेवेमुळेच व अनमोल सहकार्यामुळे ११ रुग्णांना जीवदान देण्यात यश आले, असे डॉ. देगावकर यांनी आवर्जून नमूद केले. तसेच धुळेकरांच्यावतीने डॉक्टरांना धन्यवाद देतो असे म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ११ कॅन्सर रुग्णांवर अवघड शस्त्रक्रिया करीत डॉ. नीलेश चांडक यांनी रुग्णांना जीवनदान दिले आहे.
कॅन्सरतज्ज्ञ डॉ. चांडक हे महाराष्ट्र कॅन्सर संघटनेचे वॉरीअर आहेत. आरोग्य मंत्रालयातून प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर सर्जन या दिलेला आहे. त्यात धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सर्जन मिळाले. कॅन्सरच्या सर्व रुग्णांना प्लास्टीक सर्जरी करावी लागणार होती. त्यामुळे रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवगाकर यांनी डॉ. चांडक यांना आमंत्रित केले. त्यानुसार डॉ. चांडक यांनी दीड वर्षात ११ कॅन्सरच्या रूग्णांवर विनामूल्य क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया आणि प्लास्टीक सर्जरी करीत साामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यासाठी लागणारी यंत्रणा अधिष्ठाता डॉ. दत्ता देवगावकर यांनी उभी केली होती. यासाठी मुखरोग तज्ज्ञ डॉक्टर डॉ. नितीन पाटील व डॉ. गोपाल अटलानी यांनी परिश्रम घेतले.
या शस्त्रक्रियेत काहींना जबड्याचा तर काहींना जिभेचा कॅन्सर होता. एका बाजूचे वरचे व खालच्या बाजूचे जबडे काढून त्या ठिकाणी लगेच प्लास्टिक सर्जरी सुद्धा करण्यात आली. तसेच तीस वर्षीय एका महिलेची पूर्ण जीभ काढून प्लास्टिक सर्जरी झाली. त्यामध्ये तिला श्वासनलिकेत बाहेरून केलेल्या छिद्राद्वारे ट्रेकिऑस्टोमी शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. ११ मुख कर्करोग शस्त्रक्रियांपैकी १० रूग्णाना प्लास्टिक सर्जरीची सुद्धा गरज पडली. दरम्यान, डॉ. चांडक यांनी सामाजिक बांधिलकीतून दिलेल्या योगदानबद्दल जिल्हाधिकारी यांनीही त्यावेळी कौतूक केले होते.