“अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका”चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन
जळगाव (प्रतिनिधी) :- वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणातील गाभा घटक आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केले तर निश्चितच सकारात्मक आयुष्य जगता येते. कालची चमत्कार दाखवणारी बुवाबाजी हि आज अध्यात्मिक बुवाबाजीच्या नावाखाली येऊन पोचली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले.
जळगावातील डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात युवती सभा आणि विज्ञान मंडळातर्फे “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय” याविषयी विद्यार्थिनींशी संवाद आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी “अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका”चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य डॉ. गौरी राणे, उप प्राचार्य प्रा. एस.बी. पाटील, युवती सभा प्रमुख प्रा. चांदणी चिरमाडे, प्रा. शीतल चौधरी, प्रा. अनिल बेलसरे, प्रा. धनश्री महाजन, प्रा. आर. एस. कोष्टी उपस्थित होते.
प्रसंगी पाण्याचा दिवा पेटवून उदघाटन करण्यात आले. प्रस्तावनेतून उप प्राचार्य प्रा. एस. बी. पाटील यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. यानंतर स्वयंअध्ययन परीक्षेबाबत प्रा. कट्यारे यांनी माहिती दिली. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत विद्यार्थिनींना महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी उपस्थित होते.