यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील घटना
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील डोंगरकठोरा गावाजवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या धुळे पाडा या आदिवासी वस्तीतील ६ वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या वडिलांच्या प्रसंगावधानामुळे बालकाचा जीव थोडक्यात वाचला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
धुळे पाडा येथील रहिवासी इगरा झेंदला बारेला (वय २८) हा गुरुवारी सायंकाळी मुलगा महेश (वय ६) याला सोबत घेऊन गवत आणण्यासाठी शेतात गेला होता. गवताचे ओझे घेऊन दोघे परत येत असताना, पाठीमागून अचानक बिबट्याने मुलावर प्राणघातक हल्ला केला. मुलगा महेश हा जोरात किंचाळताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता डोक्यावरचे गवताचे ओझे थेट बिबट्याच्या अंगावर फेकून प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने मागे हटून तिथून पळ काढला.
या हल्ल्यात महेशच्या डोक्याला आणि मानेजवळ गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी बालकाला पुढील उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. घटनेमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.