रावेर तालुक्यातील उटखेडा येथे घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रावेर तालुक्यातील उटखेडा येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या वादात लाठ्याकाठ्या आणि दगडांचा वापर करण्यात आल्याने फिर्यादीसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकूण १९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये दंगल आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राहुल अरुण तायडे (वय २७, रा. उटखेडा) यांचे चुलत भाऊ किशोर अशोक तायडे यांच्या दुचाकीला आरोपी रोहित संतोष तायडे याने कट मारला होता. याच कारणावरून दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परशुराम नगर परिसरातील डीपीजवळ आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादी राहुल तायडे यांच्या डोक्यावर व पाठीवर वार केले. तसेच त्यांचे वडील अरुण गोंडू तायडे यांच्या छातीवर आणि डोळ्याच्या भुवईवर गंभीर दुखापत केली. चुलत भाऊ किशोर तायडे यांच्यावरही शस्त्राने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. इतकेच नव्हे तर, फिर्यादीच्या आत्या लाडकाबाई गौतम सोनवणे यांना देखील लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. ‘यांना जिवंत सोडू नका, मारून टाका’ अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली होती.
याप्रकरणी राहुल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांनी रोहित संतोष तायडे, राहुल अशोक तायडे, संतोष अशोक तायडे, करण राहुल तायडे, गोविदा रमेश तायडे, अविनाश नामदेव झालटे, गौतम रमेश तायडे, सिद्धार्थ गौतम तायडे, आदित्य गौतम तायडे, संकेत गणेश तायडे, अर्जुन राहुल तायडे, गणेश अशोक तायडे, लताबाई संतोष तायडे, नंदाबाई गणेश तायडे, मयुरी राहुल तायडे, सखुबाई नामदेव झालटे, बेबाबाई रमेश तायडे, जिजाबाई रमेश तायडे आणि सोनाबाई नामदेव झालटे अशा १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. सिकंदर तडवी हे करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे उटखेडा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.









