नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – देशात गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 6 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 43 हजार 263 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असताना गेल्या दोन दिवसांत अचानक 12 हजारांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. काल 338 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

कालच्या दिवसात देशात 40 हजार 567 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 31 लाख 39 हजार 981 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 23 लाख 4 हजार 618 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 41 हजार 749 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 93 हजार 614 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 71 कोटी 65 लाख 97 हजार 428 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
43 हजार 263 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 30 हजार 196 रुग्ण सापडले, तर 338 कोरोना बळींपैकी केरळात 181 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे.







