नाशिक ( प्रतिनिधी ) – जीवे मारण्याची धमकी देत डोंगरावर नेऊन दोन अल्पवयीन मामे बहिणींवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष पोस्को न्यायालयाचे न्या. डी.डी. देशमुख यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
गुन्ह्याची ही घटना सन.२०१७ मध्ये मार्कड ऋषी डोंगरावर घडली होती. दिंडोरी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार अधिनीयम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शांताराम मोहन माळी ( रा.मोहाळी ता.दिंडोरी )असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका पिडीतेच्या आईने तक्रार दाखल केली होती. संशयीताने २१ आॅगष्ट २०१७ रोजी अल्पवयीन पिडीतेला दुचाकीवर चक्कर मारण्याचा बहाणा करून वणी नजीकच्या मार्कंण्ड ऋषी डोंगरावर नेऊन ठार मारण्याचा धमकी देत बलात्कार केला होता. त्यानंतरही त्याने पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार केला. २० सप्टेंबर २०१७ रोजी त्याने या पिडीतेच्या अल्पवयीन मामे बहिणीवरही बलात्कार केल्याने ही घटना उघडकीस आली होती.
पहिल्या पिडीतेच्या आईने दोन्ही मुलींना सोबत घेवून दिंडोरी पोलीस ठाणे गाठल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरी पोलीसांना माळी यास अटक करून त्याची गुह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली होती. दोन्ही गुह्यांचा एकत्रीत खटला विशेष पोस्को न्यायालयात चालला. सरकार तर्फे अॅड दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली दोन्ही गुह्यात विविध कलमान्वये वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या. या शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या आहेत.