पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे धक्कादायक घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : – तालुक्यातील शेवाळे येथील ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री दि. ५ जून रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनाबाई महारू पाटील (वय ८५ रा. शेवाळे) असे मयत महिलेचे नाव आहे. जनाबाई महारू पाटील यांना दोन मुले आहेत. यापैकी मोठ्या मुलाचे निधन झाले असून दुसरा मुलगा कृष्णाराव महारू पाटील हे शेवाळे येथे राहतात. तर जनाबाई पाटील ह्या विभक्त राहत होत्या. दरम्यान, कृष्णाराव पाटील हा त्यांचा मुलगा पाचोरा येथून काल रात्री घरी आला असता त्यांनी आईला आवाज दिला. मात्र, जनाबाई पाटील यांनी आवाज दिला नाही. यानंतर कृष्णाराव पाटील यांनी मागच्या दरवाजाने जाऊन आईचा शोध घेतला असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
यानंतर शेवाळे गावचे पोलीस पाटील अरूण पाटील यांनी पिंपळगाव पोलिसांना घटनेबाबतची माहिती दिली. यानंतर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपधीक्षक धनंजय येरूळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी कृष्णाराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वृद्ध महिलेचा मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मयत वृद्ध महिला जनाबाई पाटील यांच्यासह कुटुंबियांचा गावात कोणासोबतही वाद नव्हता. अशातच ही खूनाची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे जनाबाई पाटील यांच्या गळ्यात १० ग्रॅम सोन्याची पोत होती, असे सांगितले जात आहे. यामुळे सोन्याची दागिने लुटण्यासाठी अज्ञाताने वृद्ध महिलेचा खून केला झाला काय या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.