भुसावळ बाजारपेठ पोलिसांचा यशस्वी तपास
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ येथे सफेद भिलावा उपलब्ध असल्याचे यूट्यूबच्या माध्यमातून सांगून तेलंगणातील तरुणांना बोलावून मारहाण करून त्यांना लुटण्याचा प्रकार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून दोन होमगार्ड यांना अटक केली असून तीन संशयित फरार झालेले आहेत. दोघाही होमगार्ड यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
युट्युबवर, सफेद भिलावा असल्याची माहिती टाकण्यात आली होती व त्याखाली नंबर देण्यात आला होता. या नंबरवर तेलंगणातील मिलवकुमार पूनम (२८, कोयागुड्डम मंडळ तेगुपल्ली, जि.बद्रादी, तेलंगणा) व त्यांचा मित्र बुकीया हरीलाल यांनी संपर्क साधला. त्यांना सफेद भिलावा घेण्यासाठी भुसावळ येथे बोलवण्यात आले. ठरल्याप्रमाणे सोमवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता भुसावळ स्थानकावर ते आले. त्यांना भुसावळ तालुक्यातील साक्री फाटा जुना टोल नाक्याजवळील खदानीत नेऊन काठीने मारहाण करण्यात आली. संशयित आरोपी यांनी यावेळी २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, २० हजारांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा दोघा तरुणांकडील एकूण ६० हजारांचा ऐवज हिसकावून आरोपी फरार झाले.
मिलवकुमार पूनम याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितली. तक्रारदार पूनम यांनी ज्या नंबरवर संपर्क साधला होता त्या नंबरशी संपर्क साधून रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना निष्पन्न करण्यात आले. यात संशयित आरोपी विनोद चंद्रकांत सोनवणे (३०, जाडगाव, ता.भुसावळ) व नरेंद्र विकास सपकाळे (३०, साक्री फाटा, भुसावळ) या दोन्ही होमगार्डना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.