भुसावळ ( प्रतिनिधी ) – लुक्यातील कुऱ्हे पानाचे गावातील क्रांती चौक येथे शेतातील हिस्सा मागण्याच्या कारणावरून दोन भावांमध्ये वाद झाला. यात एका भावाने दुसऱ्या भावाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील रहिवाशी असलेले दीपक गंभीर पाटील (वय – 36) हे आपल्या परिवारासह पुणे जिल्ह्यातील दौंड येथे राहायला आहे. दरम्यान त्यांचा भाऊ राजू गंभीर पाटील रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ यांच्यात शेतीच्या हिसावरून २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता वाद झाला. त्यानंतर भाऊ राजू गंभीर पाटील याने त्याचा भाऊ दीपक गंभीर पाटील याला शिवीगाळ करत काठीने छातीवर हातावर बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या दीपक पाटील यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ राजू गंभीर पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक जाधव करीत आहे.