पाटणा (वृत्तसंस्था) – बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाने राज्यातील बेरोजगार युवकांसाठी दहा लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा केवळ आमचा वादा नाही तर तो इरादा आहे असे ते म्हणाले. आमचे सरकार स्थापन झाले तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत त्या विषयीचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
या संबंधात मोदी व भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले की त्यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली पण आम्ही अशी खोटी आश्वासने देणार नाहीं. नितीशकुमारांनी गेल्या पंधरा वर्षांच्या राजवटीत बिहारला दिवाळखोर राज्य बनवले असा आरोपही त्यांनी केला.
बिहार सरकारच्या आरोग्य, शिक्षण आणि पोलिस विभागात लक्षावधी जागा रिक्त आहेत पण त्या जागा भरण्याचा कोणताही प्रयत्न मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला नाही असा आरोपही त्यांनी केला.
बिहार मध्ये, कायदा आणि सुव्यवस्था सुधारली असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर या संबंधात जोरदार टीका करताना ते म्हणाले की, बिहार मध्ये एक लाख नागरीकांच्या मागे केवळ 77 पोलिस कर्मचारी आहेत, इतक्या दयनीय पोलिस बळावर ते राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत केल्याचा दावा कसा करू शकतात असा सवाल त्यांनी केला.