जळगाव शहरातील संतप्त घटनेत तिघांवर गुन्हे दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दीराने वहिनीवर जबरी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही बाब विवाहितेने सासूसह पतीला सांगितली असता, त्यांनी ही बाब कोणाला सांगू नको अशी धमकी देत दिराची पाठराखण केली. त्यानंतर देखील दि. १० रोजी संशयिताने वहिनीला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन दीरासह पती, सासूविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. विवाहितेचा दीर हा गेल्या दोन वर्षांपासून विवाहितेवर वाईट नजर ठेवून होता. सन २०२४ मध्ये ऑगस्ट महिन्यात घरात कोणीही नसतांना विवाहितेचा दीर हा घरात आला आणि कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने विवाहितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार विवाहितेने पती आणि सासूला सांगितल्यानंतर त्यांनी विवाहितेला धमकी दिली. त्यानंतर दीराने पुन्हा वहिनीला जमिनीवर पाडून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत तिचा विनयभंग केला. दरम्यान, हा त्रास असह्य झाल्यामुळे विवाहितेने दि. १० रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेच्या पतीसह सासू व दीराविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहे.