जळगाव ( प्रतिनिधी ) – काल महासभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जळगावची महापालिका बरखास्त करा अशी मागणी करणारे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्तां यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्तां यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई – मेलने पाठवलेल्या या निवेदनात म्हटले आहे की , महापालिका शहरातील मूलभूत प्रश्न आणि गरजांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहे , हे स्पष्ट दिसतेच आहे . महासभेत शहरातील मुद्द्यांची चर्चा आणि निर्णय होणे अपेक्षित असताना काल नगरसेवकच अत्यंत लाज वाटावी अशा पद्धतीने भांडताना सगळ्या जगाने पाहिले . हे सगळेच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक हप्तेखोरी आणि कमिशनखोरीचे आरोप एकमेकांवर करतात . भाषणापुरते ते शहराच्या विकासाचे बोलतात आणि वास्तवात असे खालच्या पातळीवर जाऊन भांडतात . यावरून त्यांना शहराच्या प्रश्नांची जाणीव किती असेल , असा प्रश्न आता सामान्यांना पडतो आहे . काल महासभेत राष्ट्रगीताचाही अवमान नगरसेवकांनी केला आहे . या सगळ्या पार्शवभूमीवर महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा , अशी मागणी दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे.