नवी दिल्ली:(वृत्तसंस्था ) ;- प्रजासत्ताक दिनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात लक्खा सिधाना याचं नाव पुढे आलं आहे. लक्खा सिधाना यानेच ही हिंसा भडकवल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लक्खाचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पंजाबच्या गावांमधील लोकांना तो भडकवताना या व्हिडीओत दिसत आहे. तसेच सरकारला झुकवायचं असेल तर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत जायला हवं असं सांगतानाही तो या व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे लक्खावर पंजाबमध्ये दोन डझन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दिल्ली पोलीस सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून लक्खा विरोधातील पुरावे गोळा करत आहे.
या व्हिडीओतून लक्खा सिधाना केवळ शेतकऱ्यांनाच भडकावत नाही तर मीडियालाही धमकावत असल्याचं दिसून येत आहे. तरुणांना आपण भडकावत असल्याचा मीडियाने प्रचार करू नये, असा इशारा देताना तो या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ 17 जानेवारीचा आहे. आपण समाजसेवक असल्याचं सांगणाऱ्या लक्खावर पंजाबमध्ये दोन डझनपेक्षाही गुन्हे दाखल आहेत. हत्या, अपहरण, खंडणी आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याशिवाय आर्म्स अॅक्ट अंतर्गतही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असून या प्रकरणामध्ये त्याने शिक्षाही भोगलेली आहे. तर अनेक प्रकरणात साक्षीदार किंवा पुरावे नसल्याने त्याची निर्दोष सुटकाही झालेली आहे.
सध्या लक्खाने स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच तो शेतकरी आंदोलनात आला होता असं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वीच बठिंडा पोलिसांनी त्याला लखनऊ हायवेवर एका साईन बोर्डला काळं फासलं म्हणून अटक केली होती. पंजाबमध्ये साईन बोर्ड केवळ पंजाबी भाषेत असावेत अशी मागणी त्याने केली होती.
यापूर्वी लक्खाने मनप्रीत बादल यांच्या पीपीपी पार्टीमधून पंजाबच्या रामपुरा फूल विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. सध्या तो शेतकरी आंदोलनात सामिल झाला होता आणि तीन कृषी कायद्यांचा विरोध करत होता.
दरम्यान, आयटीओ येथे झालेल्या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयपी स्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ज्याने ट्रॅक्टरवर स्टंट केला आणि पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करताना ज्याचा मृत्यू झाला त्याचंही या एफआयआरमध्ये नाव आहे. तसेच हिंसा भडकावणाऱ्या अज्ञातांची नावेही एफआयआरमध्ये दाखल आहेत. विशेष म्हणजे या हिंसेप्रकरणी लक्खाला जबाबदार धरलं जात असलं तरी त्याचं नाव कोणत्याही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही.