बैलगाडी रॅली काढून जामनेरात वेधले लक्ष
जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी सोमवारी दि. २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी ढोलताशांच्या गजरात बैलगाडीवर रॅली काढून जामनेरात लक्ष वेधून घेतले.
जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहिर झाली. त्यानंतर खोडपेंनी मतदारसंघात गाठीभेटी घेऊन संवाद सुरु केला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांनी बैलगाडी रॅली काढली. तहसील कार्यालयावर जाऊन रॅली विसर्जित झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन दिलीप खोडपे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी राजू बोहरा, दिगंबर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, जावेद मुल्लाजी, प्रल्हाद बोरसे, ज्ञानेश्वर बोरसे, राहुल चव्हाण, मनोज महाले, मुलचंद नाईक, सोनुसिंग राठोड, प्रदीप गायके, अनिल बोहरा यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना दिलीप खोडपे म्हणाले की, खात्रीने सांगतो, यावेळेला निवडणुकीतील चित्र उलटे दिसेल. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे यंदा मतदारसंघात चित्र आहे. समोरचा उमेदवार जरी मोठ्या वल्गना करीत असले तरीही त्यांनी धसका घेतला आहे. भारतीय जनता पक्षात असताना संवादाला प्रतिसाद मिळाला म्हणूनच आम्हाला पक्ष सोडून जावे लागले, असेही दिलीप खोडपे म्हणाले.
०००००००००००००