उद्या पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाप्रकरणी एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिला आहे. हा हल्ला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडला जात असल्याने राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

स्फोटानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “या स्फोटाशी संबंधित हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही.” त्यांनी फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलवरही भाष्य करताना दोषींना शिक्षा मिळणारच, असा दम भरला. स्फोटाचा कसून आणि वेगाने तपास सुरू आहे.
या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचे नाव सातत्याने येत असल्याने भारत-पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
उद्या दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भूतान देशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा संपल्यानंतर उद्या, बुधवारी दिल्लीत स्फोटाप्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे केवळ भारतीय प्रसारमाध्यमांचेच नाही, तर पाकिस्तानमधील मीडियाचेसुद्धा बारकाईने लक्ष लागून राहिले आहे.
आत्मघातकी हल्ल्याची शक्यता
प्राथमिक तपासातून हा स्फोट आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता बळावली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद मॉड्यूल उघडकीस आणल्यामुळे दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी पहिली छापेमारी केली होती आणि गेल्या दीड आठवड्यात या नेटवर्कमधील काहींची धरपकड केली.
आपले बिंग फुटण्याच्या भीतीने एका दहशतवाद्याने लाल चौकाजवळ कारमध्ये हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दहशतवाद्यांचा भारतात अनेक ठिकाणी मोठा स्फोट घडवण्याचा कट होता, मात्र जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो उधळला गेला. जगभरातील नजरा या बैठकीकडे लागल्या असून, सरकार या स्फोटाला कसे प्रत्युत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









