वहिनीकडून ‘मोठा खुलासा’
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी, 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने अख्खा देश हादरला आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात 9 जणांनी जीव गमावला असून 30 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
या स्फोटाचा मास्टरमाईंड आणि आत्मघातकी हल्ल्याचा संशयित डॉ. उमर याला पकडण्यासाठी पोलीस कसून शोध घेत आहेत.हा हल्ला डॉक्टर असलेल्या उमरनेच घडवल्याची चर्चा आहे. तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी आहे. उमरचा शोध सुरू असतानाच, पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, डॉ. उमरच्या वहिनीने एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
वहिनीने केला मोठा खुलासा
डॉ. उमरच्या वहिनीने पोलिसांना सांगितले की, स्फोटाच्या काही दिवस आधी, म्हणजेच शुक्रवारी तिचे उमरशी बोलणे झाले होते. त्यावेळी उमरने त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितले होते की, “मला जास्त फोन करून त्रास देऊ नका. मी लायब्ररीमध्ये कामात व्यस्त असेल.” दहशतवादी उमरची हीच ‘एक चूक’ त्याच्या घरच्यांसाठी महागात पडली. त्याने आईला फोन न करण्याचा सल्ला दिल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तत्काळ त्याच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कोण आहे डॉ. उमर ?
डॉ. उमर हा पुलवामामधील कोइल येथील रहिवासी आहे.
त्याने 2017 मध्ये श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते.
तो अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होता.
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागातून ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टर्सच्या ‘मॉड्यूल’शी उमरचाही संबंध असल्याचे बोलले जात आहे. या डॉक्टर्सकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान, फरिदाबाद मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या डॉ. शाहीना हिचा उल्लेख समोर आला आहे. डॉ. शाहीनाला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची महिला शाखा ‘जमात उल मोमिनत’ भारतात स्थापन करण्याचे काम सोपवण्यात आले होते. सादिया अझहर, जी मसूद अझहरची बहीण आहे, ती पाकिस्तानातील जैशच्या महिला शाखेची प्रमुख आहे. या मॉड्यूलमध्ये डॉ. उमरचा काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
सध्या डॉ. उमरचा कसून शोध सुरू असून, त्याच्या आई आणि भावाच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे









