जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची भीती दाखवत सायबर गुन्हेगारांनी यावल तालुक्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला तब्बल नऊ लाख पन्नास हजार रुपयांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बामणोद (ता. यावल) येथील सुरेश काशिराम नेहेते (वय ६७) या वृद्ध शेतकऱ्याला ‘तुमच्या आधार कार्डावरून दहशतवाद्यांना पैसा पुरवला गेला असून, तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे,’ असा खोटा आरोप करत सायबर ठगांनी हा मोठा बनाव केला.

दि. ३० ऑक्टोबर रोजी सुरेश नेहेते यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या आधार कार्डाचा वापर करून कॅनरा बँकेत खाते उघडल्याचे आणि त्या खात्यातून वीस कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. दुसऱ्याच दिवशी, दि. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना पुन्हा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. यावेळी पोलिसांच्या गणवेशातील एका व्यक्तीने पाठीमागे मुंबई पोलिसांचा लोगो दाखवत, ‘तुमच्यावर अटक वॉरंट निघाले आहे, तुम्हाला ताबडतोब डिजिटल कस्टडीत घेतले जाईल,’ अशी धमकी दिली.
या खोट्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ठगांनी सतत व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्यास सांगत नेहेते यांची संपूर्ण वैयक्तिक आणि बँक माहिती मिळवली. त्यानंतर ‘तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यावर रक्कम परत केली जाईल,’ असे सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने सिटी युनियन बँकेतील एका खात्यात आरटीजीएसद्वारे तब्बल ९ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
पोलिसांच्या सततच्या धमकीमुळे वृद्ध शेतकरी प्रचंड घाबरले आणि त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर केले. मात्र, नंतर संशय आल्यावर त्यांनी मुलाला हा प्रकार सांगितला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दि. १ नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा पोलिसांच्या नावाने आलेल्या संशयास्पद कॉलवर विश्वास ठेवू नये आणि अशी धमकी आल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन ‘१९३०’ वर संपर्क साधावा, असा इशारा सायबर पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.









