जळगाव ( प्रतिनिधी ) – धुळ्यातील चिसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत ट्रकसह ४२ लाखांचा गुटखा जप्त केला आहे . या कारवाईत ट्रकचालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे .
काल स पो नि संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की ट्रक क्रमांक एम एच १५ – जी व्ही ९७४१ हा मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ घेऊन मालेगावहून जळगावकडे जात आहे . त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या . त्यांनतर या पथकाने धुळ्यातील हॉटेल द्वारका लॉजजवळ सापळा रचून हा ट्रक अडवला मात्र ट्रकचालकाने पोलिसांकडे दुर्लक्ष करून पळून जाण्याचा प्रयत्न केला . त्यांनतर पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ रात्री ११. ३० वाजता पकडला . पोलिसांनी ट्रकचालकाकडे आणि क्लिनरकडे चौकशी केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . पोलिसांनी ट्रकचालक शेख हारून शेख हुसेन ( वय ४८ , रा – गल्ली न ९ , आझादनगर , मालेगाव ) आणि क्लिनर मोहम्मद समील मोहम्मद सलीम ( वय १९ , रा कमालपुरा , मालेगाव ) यांना अटक केली आहे . या दोघांच्या विरोधात भा द वि ३२८ आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाईत २६ लाखांच्या ट्रकसह ४२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ असा ६७ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .
स पो नि संदीप पाटील , पो उ नि एन जी चौधरी , पो उ नि नासिर पठाण , हे कॉ पंकज चव्हाण , कैलास वाघ , पो ना भुरा पाटील , अविनाश पाटील , संदीप कढरे , हेमंत पवार , स्वप्नील सोनवणे , सोमनाथ चौरे , प्रशांत पाटील , शरद जाधव . किरण राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.