जळगाव LCB ची मोठी कारवाई,
३ चोरीच्या दुचाकी जप्त!
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. धुळे जिल्ह्यातून एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून एकूण तीन चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील वाहन चोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. पारोळा पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होता. जिल्ह्यात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपींचा तत्काळ शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोह. विष्णू बि-हाडे, पोह. दीपक माळी, पोह. रवींद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील आणि चालक दीपक चौधरी यांचे एक विशेष तपास पथक तयार केले.या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, मनोज पांडुरंग गायकवाड नावाचा आरोपी चोरीची मोटारसायकल घेऊन धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत लामकाणी येथे फिरत आहे.मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपी मनोज गायकवाड याला लामकाणी, धुळे येथून ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी मनोज गायकवाड याने चोरीची कबुली दिली. त्याने पारोळा पो. स्टे. आणि जळगाव तालुका पो. स्टे. येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरी केलेल्या तीन मोटारसायकल पोलिसांना काढून दिल्या.









