धुळे (प्रतिनिधी) – पंतप्रधान आवास योजनेच्या मंजूर घरकुलाचे फोटो काढून नजर तपासणी करून मूल्यांकन सादर करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणार्या शिरपूर पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता भूषण शामराव वाघ (25 रा.श्रमसाफल्य कॉलनी, होमगार्ड ऑफिसच्या पाठीमागे, वलवाडी देवपूर, धुळे) यास शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेमल्या गावातून अटक करण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिरपूर तालुक्यातील शेमल्याच्या 32 वर्षीय तक्रारदारास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले आहे. मंजूर घरकुलाचे फोटो काढून नजर तपासणी करून मूल्यांकन सादर करण्यासाठी आरोपी भूषण वाघ याने 24 फेब्रुवारी रोजी तक्रारदाराकडे लाच मागितली होती मात्र तक्रारदारास लाच द्यावयाची नसल्याने त्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शनिवार, 29 रोजी सकाळी आरोपी घरकुलाचे फोटो काढण्यासाठी शेमल्या गावात दाखल होवून तक्रारदाराकडे पोहोचला. यावेळी तक्रारदाराच्या घरातच पथकाचे अधिकारी ठाण मांडून होते. आरोपीने लाच स्वीकारताच पंचांसमक्ष त्यास अटक करण्यात आली. हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, संदीप सरग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर आदींच्या पथकाने यशस्वी केला.