अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील जळगावचे दोघे जागीच ठार

धुळे जिल्हयातील फागणे गावाजवळील घटना
धुळे प्रतिनिधी : धुळे- जळगाव मार्गावरील फागणे गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जळगावमधील दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत ही दुर्घटना घडली.या अपघातात दीपक मोतीलाल भामरे (45) आणि पन्नालाल भगवान वर्मा (दोन्ही रा. जळगाव) हे दोघेही जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक भामरे आणि पन्नालाल वर्मा हे दोघेजण आपल्या एमएच 19 सीई 1719 क्रमांकाच्या दुचाकीवरून धुळ्याकडून जळगावकडे जात असताना फागणे गावाच्या पुढे एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









