ठाणे ( वृत्तसंस्था ) – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा महागात पडेल, असे फोनवर धमकावण्यात आले आहे. सातत्याने कॉल्स येत असल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराभोवतीदेखील सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
नवाब मलिक यांनी एनसाबीचे विभागीय संचालक यांच्यावर खंडणीचा गंभीर आरोप केला आहे.हे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर मलिक यांना वेगवेगळ्या राज्यातून धमकीचे फोन येत आहेत. आज सकाळी सात वाजता त्यांना धमकीचा फोन आला. नवाब मलिक यांच्या सुरक्षा रक्षकाने हा फोन कॉल उचलला होता.
नवाब मलिक यांना शुक्रवारी सकाळी राजस्थानहून निनावी फोन आला होता. समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं बंद करा. अन्यथा महागात पडेल अशी धमकी या फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली. नवाब मलिक यांना यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. याच कारणामुळे आता त्यांच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांची बहीण जाम्सिन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असं मलिक यांनी म्हटलंय.समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार. वर्षभरात नोकरी जाईल. त्यांचा तुरुंगवास निश्चित आहे, असे आव्हानदेखील मलिक यांनी वानखेडे यांना दिले.