केरळमध्ये पर्यटनासाठी गेल्यावर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी येथील मूळ रहिवासी व सध्या जळगाव येथे राहणारे प्रौढाचा केरळमधील प्रवासात रेल्वेतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दि. २३ मार्चच्या मध्यरात्री कासारगड-निलेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. यामुळे जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.
प्रकाश गणेशमल जैन (वय ६५) असे मृत प्रौढाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश जैन हे व्यवसायाने शेतकरी असून जळगाव येथे औषध विक्री व्यवसायात मुलाला मदत करत होते. ते कुटुंबासह केरळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. दि. २१ मार्च रोजी भुसावळहून मंगला सुपरफास्ट एक्स्प्रेसने त्यांनी प्रवास सुरू केला होता. प्रवासादरम्यान २३ मार्च रोजी रात्री एक ते दीडच्या सुमारास लघुशंकेसाठी गेलेल्या प्रकाश जैन यांनी पुढील स्थानक किती दूर आहे, हे पाहण्यासाठी दरवाजाजवळ गेल्यानंतर तोल जाऊन ते रेल्वेतून खाली पडले.
रेल्वेत अन्य प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरड केली. त्यांचा मुलगा स्वप्निल जैन यांनी तत्काळ चैन ओढून रेल्वे थांबवली आणि घटनास्थळी धावत गेले. त्यांना लोखंडी पाइप लागल्याने पोटाला गंभीर दुखापत झाली होती. मोठा रक्तस्राव झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. रेल्वे पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने कासारगड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव जळगाव येथे आणण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. साकळी गावातील एक प्रगतीशील शेतकरी, धार्मिक वृत्तीचे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व गमावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.