चाळीसगाव येथे उतरवून महिलेवर उपचार
जळगाव (प्रतिनिधी) :- मेमू ट्रेनमध्ये गर्भवती असलेल्या महिलेला वेदना होत आहे याची माहिती मिळताच महिला उपनिरीक्षकासह आरपीएफच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने प्रसंगावधान राखून तत्काळ गरोदर महिलेला चाळीसगाव येथे उतरवले. ट्रेनमध्ये प्रवास करणारे डॉक्टरही मदतीला धाऊन आले आणि महिलेने स्टेशनवरच एका बाळाला अर्थांत गोंडस अशा मुलीला जन्म दिला.
मध्य रेल्वे, “ऑपरेशन मातृशक्ति” अंतर्गत रेल्वे संरक्षण दलाने आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान शक्य ती सर्व मदत करत आहे. यामध्ये मार्गात स्थानकांवर वैद्यकीय सुविधा, महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेणे, नातेवाईकांना माहिती देणे इत्यादींचा समावेश या अंतर्गत आहे.नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, रेल्वे संरक्षण दलाने गुरुवार दि.१२ रोजी चाळीसगाव स्टेशनवर एका महिलेला प्रसूतीसाठी मदत केली.
चाळीसगाव येथील उप स्टेशन व्यवस्थापक यांना इगतपुरी-भुसावळ मेमू मध्ये एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना होत असल्याची माहिती मिळाली. महिला उपनिरीक्षकासह आरपीएफच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने सावधपणे महिलेला चाळीसगाव येथे उतरवले. ट्रेनमध्ये प्रवास करणारे डॉक्टरही मदतीला धाऊन आले आणि महिलेने स्टेशनवरच एका मुलीला जन्म दिला. आई व बाळाला पुढील उपचारासाठी चाळीसगाव सिव्हिल हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहे.