जळगाव ( प्रतिनिधी ) – धावत्या दुचाकीवरून महिलेची चैन हिसकावत दुचाकीवरून आलेले चोरटे फरार झाल्याची घटना काल कुसुमबा गावाजवळच्या अहिंसातीर्थ गोशाळेजवळ घडली .
जळगावातील रिंगरोड भागातील राजरत्न अपार्टमेंटमधील रहिवाशी सरोज प्रफुल्लकुमार चोपडा या काल पती प्रफुल्लकुमार चोपडा यांच्यासोबत दुचाकीने उत्तरकार्यासाठी गेल्या होत्या . जामनेरहून हे दाम्पत्य परत जळगावकडे येत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुसुमबा गावाजवळच्या अहिंसातीर्थ गोशाळेजवळ पाठीमागून येणारी दुसरी मोटारसायकल त्यांच्या दुचाकीजवळून जात होती . या मोटारसायकलवर २५ ते ३० वयोगटातली २ तरुण होते . या दाम्पत्याच्या अगदी जवळ आल्यावर या दोन तरुणांपैकी त्यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या एकाने सरोज चोपडा यांच्या मानेला जोराचा हिसका देत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ काढणारे हे तरुण अत्यंत वेगात पुढे जळगावच्या दिशेने फरार झाले . सरोज प्रफुल्लकुमार चोपडा यांच्या फिर्यादीवरून या दोन अज्ञात चोरट्यांविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .