एसएनडीटी विद्यापीठ, डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयातर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धेत महिला खेळाडूंनी आपले कसब पणाला लावून विजयासाठी स्पर्धेत प्रयत्न करताना दिसून आले. तर दिवसभर खेळाडूंच्या कौशल्याचे व खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी कौतुक केले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एकलव्य क्रीडा संकुल मैदानामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात भालाफेक या क्रीडाप्रकारात सहभागी खेळाडूंनी कौशल्य पणाला लावून चुरस निर्माण केली होती. या स्पर्धेत एसएमआरके महाविद्यालय, नाशिकच्या पृथ्वी शेट्टी हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर सोलापूर जिल्ह्यातील पाणीव येथील श्रीराम संस्थेची साक्षी ठोंबरे हिने द्वितीय व अकलूज येथील पाटील विद्यालयातील सोनाली वाघमोडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. उंच उडी स्पर्धेत सांगली येथील शाह महाविद्यालयाची साक्षी माळी प्रथम विजेती ठरली. तर पाणीव जि. सोलापूर येथील श्रीराम महाविद्यालयाच्या स्वप्नाली आद्रट हिने द्वितीय व कीर्ती काटे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
ऍथलेटिक्स स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुंबई येथील जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दिव्या पिंगळे हिने २ मिनिट ३८ सेकंदात प्रथम तर याच महाविद्यालयाच्या स्नेहल पाटील हिने २ मिनिट ५५ सेकंदात तृतीय क्रमांक मिळविला. तर शाह महाविद्यालय, सांगलीची सानिका केरिपाळे हिने २ मिनिट ४४ सेकंदात शर्यंत पूर्ण करून द्वितीय क्रमांकावर यश मिळविले. ५ हजार मीटर या स्पर्धेत मुंबई येथील जाधव महाविद्यालयाच्या दोन्ही विद्यार्थिनी दिव्या पिंगळे हिने २० मिनिट ८ सेकंदात शर्यत पूर्ण करून प्रथम तर याच महाविद्यालयाची अदिती पाटील हिने २१ मिनिट ३६ सेकंदात यश मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला. जुहू येथील विधी महाविद्यालयाची प्रतीक्षा चोरमले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच, १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत माटुंगा महाविद्यालयाची खेळाडू मंजुषा शेट्टी हिने प्रथम, चर्चगेट महाविद्यालयाची ऋणाली पाटील द्वितीय तर सांगलीच्या शाह महाविद्यालयाची पल्लवी बगाडी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ४०० मीटर स्पर्धेत मुंबईच्या जाधव महाविद्यालयाची अदिती पाटील हिने प्रथम, तर स्नेहल पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला. माटुंगा महाविद्यालयाची खेळाडू मंजुषा शेट्टी हि द्वितीय आली. गोळाफेक स्पर्धेत खेळाडूंच्या ताकदीची परीक्षा ठरली. यात नाशिक महाविद्यालयाची खेळाडू पृथ्वी शेट्टी हिने प्रथम तर पुणे महाविद्यालयाची अनुष्का शिंदे हिने द्वितीय, मालाड महाविद्यालयाची ऋतुजा देवकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
दुपारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मैदानावर व्हॉलीबॉल, रस्सीखेच व तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रत्येक सामन्यात चुरस निर्माण झालेली दिसून आली आहे. तायक्वांदोपटूंची धडाकेबाज कामगिरी दिसून आली. व्हॉलीबॉलमध्ये मैदानावर खेळाडूंची जबरदस्त किक पाहायला मिळाली. रस्सीखेचमध्ये खेळाडूंच्या ताकदीची व बुद्धीची परीक्षा ठरली. प्रत्येक संघ विजयासाठी कसब पणाला लावत होता. दरम्यान, पूर्ण स्पर्धेत, एसएनडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके, प्राचार्या कविता देशमुख, डॉ. प्रमोद वारके यांनी उपस्थिती देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन केले.