धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय “कर्मवीर चक्र” पुरस्कार
धरणगाव – आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था iCONGO आणि संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०२४-२५ या वर्षीच्या प्रतिष्ठित “कर्मवीर चक्र” पुरस्कारासाठी धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांची निवड होऊन त्यांना दिल्लीत सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा जागतिक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. लोणारी यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असताना जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी म्हणून निवडक योगदान दिले. विविध महत्त्वपूर्ण आरोग्य योजनांची प्रभावी प्रसिद्धी त्यांनी केली असून, विशेषतः कोविड महामारीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. पुणे येथील राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागाने त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले होते.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार त्यांच्या नावे जाहीर झाला. २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याशिवाय ग्रामविकास विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४ अंतर्गत देखील श्री. लोणारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत व मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते “गुणवंत अधिकारी/कर्मचारी” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला होता.
iCONGO आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडून दिला जाणारा “कर्मवीर चक्र” हा जागतिक दर्जाचा सन्मान मानला जातो. हा पुरस्कार मिळाल्यामुळे श्री. लोणारी यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून आरोग्य सेवेत त्यांनी दाखवलेल्या समर्पणाची ही ठोस पावती ठरत आहे.









