जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यातील मायक्रो फायनान्स महिला बचत गटांचे मार्च २०२० पर्यंतचे कर्ज राज्य आणि केंद्र सरकारने माफ करावे या मागणीसाठी ६३ दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा गायत्री सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनात आमदार राजूमामा भोळे यांनी मध्यस्थी केल्यांनतर आज जिल्हा प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले .
आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालायातील गृह विभागाचे नायब तहसीलदार विलास हरणे यांनी या आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले . यावेळी आमदार राजूमामा भोळेही उपस्थित होते . यापूर्वीही आमदार राजूमामा भोळे यांनी या आंदोलनकर्त्यांची जिल्हा प्रशासनाशी चर्चा घडवून आणली होती . मात्र आंदोलनकर्त्यांना निर्णायक आश्वासन मिळत नव्हते .
खासदार उन्मेष पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , १२ ऑक्टोबरपासून उपोषणकर्त्यांनी हा मुद्दा जिल्हा प्रशासनापुढे मांडलेला आहे . उपोषणस्थळी चर्चेनंतर आपण उपोषणकर्त्यांची आमदार राजूमामा भोळे यांच्याशी भेट घालून दिली होती आणि नन्तर जिल्हा प्रशासनाशी चर्चा घडवून आणली होती . यापुढेही या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा आपण सनदशीर मार्गाने पाठपुरावा करणार आहोत . हे आंदोलन आता मागे घेतले जावे असे आवाहनही खासदार उन्मेष पाटील यांनी केले आहे . मात्र आंदोलन मागे घेण्याबद्दल आज लगेच निर्णय होऊ शकलेला नाही.