धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी):- आजारी मुलीच्या देखभालीसाठी दोन दिवसांची रजा मागण्यास गेलेल्या एका ३५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धरणगाव तालुक्यातील जळगाव शहरालगत शिवारातील कंपनीत सप्टेंबर २०२५ मध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित महिला (वय ३५, रा. जळगाव) ही खासगी नोकरी करते. तिची मुलगी आजारी असल्याने ती रजा मागण्यासाठी आरोपी अधिकारी जनार्दन (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या सिक्युरिटी केबिनमध्ये गेली होती. यावेळी आरोपीने तिचा विनयभंग केला. “तू खूप सुंदर दिसतेस, मला खुश कर, तुला १० दिवसांची पगार न कापता रजा देईन,” असे म्हणत आरोपीने पीडितेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या कानाखाली मारून तिला जमिनीवर पाडले. “माझ्या ओळखीचे सर्व पोलीस आणि गुंड आहेत, जर मला खुश केले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे मारीन,” अशी धमकी त्याने दिली. इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेचा गणवेश (टी-शर्ट) काढून लज्जास्पद कृत्य केले आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील चित्रित केले. ही बाब कोणाला सांगितल्यास किंवा पोलीस तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.
या भीषण प्रसंगानंतर पीडित महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तपास पो.ह.कॉ. प्रवीण तांदळे पाळधी दूरक्षेत्र करीत आहेत. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.









